मला आवडलेल्या पोस्ट(c & p)

*"परतफेड"*

कसे आहात..??"

एवढा एकच प्रश्न तिने विचारला..
आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो..
ती म्हणाली.. "भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."
त्या नंतर तिने जे काही सांगितलं.. त्या मुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला..!

"तिनं काय सांगितलं..??"

ती शांतपणे म्हणाली.. "की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बरयाचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"
"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी..."

जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.. तो  अकाउंट तुमचा संपला..!
आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत..
ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात..
परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही...
तेंव्हा मनातल्या मनांत सुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का जगवलंस..?"
हा प्रश्न विचारू नका..

*कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्या कडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकरांचं कोणाला विस्मरण झालं.. "तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..*

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  'Account Closed..' असा शिक्का मारतात ना त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती 'Account Closed' झाले ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एक ही क्षण टाळू नका...

कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल..
पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..

*_तेंव्हा मनाला सांगा.. "बाबा रे..आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!"_*

हा प्रयोग करा आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या..

मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही..तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा..

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. "परतफेड आणि परतफेड" हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल.....
आणि मी येते... असं म्हणत ती निघून गेली..

इतकं सगळं बोलून गजा उठला आणि म्हणाला..
" आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खुपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे.."
"तुम्ही सहन करतो, सहन करतो.." हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असतात.."

*"जो सहन करतो ना..तो कधी बोलत नाही..!"*

चला तर मिञांनो, आज पासुन आपण सुध्दा आपल्या आयुष्यात कोणा कडुन अपेक्षाभंग करुन घेण्या ऐवजी फक्त "परतफेडीचं" आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवुया..

एक छोटासा प्रयत्न...
(संग्रहित)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*‘घाई’माणसाला संकटात नेई*

अखेर पुन्हा एकदा ठाणे-पुणे कुलूपबंद झालं. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे मिळते, फळे बघा आहेत का, धक्के देत ठाण्याचा जांभळी नाका व पुण्याची गुलटेकडी गजबजली जात असेल तर ‘कोरोना’ तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे.
लग्न करण्याची घाई, पोरं जन्माला घालण्याची घाई, त्या पोरांना शाळेत घालण्याची घाई, त्यांची करिअर करण्याची घाई, परदेशात धाडण्याची घाई, मोठ्या पॅकेजची घाई, प्रशस्त मोठ्ठं घर-कार खरेदीची घाई, बँक बॅलेन्स वाढविण्याची घाई. ही घाईची परंपरा थोडी तपासून पहा. अख्खी पिढी भरकटल्याचा प्रत्यय येईल.

पूर्वी विवाह लवकर व्हायचे. संतती 10 वर्षांनी झाली तरी रागवत नव्हतं. आज? पूर्वी मुलं 5-6 वर्षे मैदानावर - नदी - डोहावर हुंदडायची मग शाळेत प्रवेश घ्यायची. आज? घर-कार मेहनत करून घेऊ. आज बँका दारात कर्जाची घाई. पूर्वी 80-90 नंतरच मरणाचा विचार. आता मरणाचीही घाई. 22-25 वर्षांची पोरं मोटरसायकल अपघातात मरतात तेव्हा मोटरसायकल घेऊन देणार्‍या मातापित्यांची कीवच येते. घाई... घाई... आणि घाईच!

प्रगतीच्या नांवाखाली 60 दिवसांचे टॉमेटो 22 दिवसांत लाल होवून बाजारात येते. 35 दिवसांची कोथिंबीर 20 दिवसांत जुडीत विसावते. सायन्सला घाई, खाणार्‍याला घाई अन् पिकविणार्‍यालाही घाईच. म्हणे प्रगती!

एवढी घाई करून शेतकरी सुखी आहे? शास्त्रज्ञ भारतात न थांबता अमेरिकेत पळतात? मग एखादा कोरोना आला की पुन्हा गावाकडे का पळता? पळण्याचीही घाईच!

सगळीकडे घाई. घाईतच वाचन व घाईतच सेवन आणि जेवणही.
मित्रांनो, ही घाई आज का लिहिली?

स्वतः थोडे बदला. आठ दिवस भाजी खाल्ली नाही. डाळ उकडून खाल्लीतर मरण येणार आहे का? घराबाहेर पडता? कोरोना संसर्गामुळे फैलावतो हे माहित असताना स्वतःसह इतरांचा जीव का धोक्यात घालता?

व्यापारी वर्गालाही चाप देणं गरजेचं आहे. गाय छाप तंबाकू 10 रुपये. हे मागच्या दाराने 70 रु. विकतात. जीवनावश्यक वस्तुुंचा काळाबाजार. श्रीमंत होण्याची घाई. अखेर कोरोना पॉझिटीव्ह झाला. त्या व्यापार्‍याची बायको 18 दिवसात विधवा झाली. मरण्याचीही घाई!

कोरोनाचे पेशंट व त्यांचे अंत्यसंस्कार आपण टी. व्ही. च्या पडद्यावर पाहतो. कचरा फेकतो तसे मृतदेह फेकतात. श्वानाची विष्ठा गाडावी तसे प्रेत गाडतात. चिखल तुडवावा तशी शवागरात ही मेलेली माणसं ते वॉर्डबॉय तुडवितात. हे सगळं पाहता मग बदलत का नाही? ज्या बापाने आयुष्यभर कष्ट केलं, दोन वेळचं धड जेवला नाही. त्याचा कोरोनाने घात केला.

घरातूनच घाई!
अहो, ऐकलं का? भाजी आणा अहो, ऐकलं का? किराणा आणा, दुध आणा, फळे आणा, मांस-मटण आणा. ही आणण्याची घाई त्याच्या जीवावर बेतली.

म. गांधी 42 दिवस उपाशी राहिल्याची नोंद इतिहासात आहे. गांधींचा देश आहे. 12 दिवस डाळरोटी खाऊन जगू शकत नाही?

*मित्रांनो, मरणाची एवढी घाई करू नका.*

2020 हे पैसे कमविण्याचे वर्ष नाही. हे वर्ष आहे स्वतःला जीवंत ठेवण्याचे. जो जीवंत राहिला तिच त्याची खरी प्रॉपर्टी. तेच त्यांचं कौटुंबिक विश्व.
घराबाहेर पडू नका. वाचन करा, विनोद करा, नृत्य करा, संगीत ऐका. बायकोची छेड काढा, पुन्हा तिची मनधरणी करा, उत्तम चहा करायला सांगा. प्रेमाच्या चार गोष्टी करा. मित्रांना फोन लावा. जुन्या आठवणी ताज्या करा. घाई करू नका. घराबाहेर प्लीज पडू नका.🙏🙏
(संग्रहीत)
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

👌खूपच छान👌

          *दोन घास*

*नुकतेच लग्न झाले होते आणि सासू सासऱ्यांकडे मी राहात होते. सासरे रेल्वेतील निवृत्त अधिकारी पेन्शनर होते. पूर्ण वेळ देवाचे नाम घेणे, जप करणे, घरातील सर्व सामान मंडईतून स्वतः आणणे, ज्योतिषाचा व्यासंग जपणे वगैरे गोष्टीत सासरे मन रमवायचे. सासूबाई घरची सर्व कामे पहाणे, स्वैंपाक करणे, येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणे यातच नेहमी व्यस्त असायच्या. सासू सासरे अत्यंत देवभक्त व धार्मिक वृत्तीचे होते.*
*नवरा डॉक्टर व कमवता असल्याने घरी ठीक चालत होते. मी तेव्हा लग्नानंतरही शिकत होते.*

*त्या वेळी आमच्याकडे सुमन नावाची मोलकरीण धुणी-भांडी, व घरची साफ-सफाईची देखील कामे करायची. पूर्ण चाळीत चार पाच जणांकडे ती कामे करायची. माझ्या सासूबाईंना एक सवय होती. त्या गरम गरम चपात्या करायच्या तेव्हा रोज सुमनला अगत्याने बोलवायच्या आणि "खा गं सुमन" म्हणून सुमनला अगत्याने तव्यावरची गरम चपाती चहाबरोबर द्यायच्या. तोपर्यंत कुणीच सकाळी जेवलेले नसायचे, पण सुमन मात्र सासू बाईंच्या हातच्या गरम चपाती व चहाची हिस्सेदार व्हायची. दारावर पारू आणि तिची मुलगी मीना मासे विकायला यायच्या. एवढी मोठी टोपली दूरवरून ट्रेननी आणायची आणि दारोदार विकायची हे या कोळीणींचे हेच तेव्हढे उदरनिर्वाहाचे साधन होते.*

*मी सासूबाईंना 'अहो आई' म्हणत असे. आई पारू, व मिनालाही जेऊ घालायच्या.. 'अगं थोडी भाजी चपाती खा, दूरून आलीस तू, दोन घास तरी खा" म्हणून अगत्याने बसवून आई त्यांना खायला द्यायच्या...*
*घरी माणसांची आवक मोठी होती, सतत पाहुण्यांचा राबता असायचा..कुणीही जेवल्याशिवाय जायचे नाही, दोन घास खाऊनच जायचे हा जणू आमच्या आईंचा नियमच होता..त्यावेळी माझा नवरा एकटा कमवता आणि असे सर्वाना आई का खायला घालत सुटल्या आहे ह्याबद्दल माझे सरंजामी मन अनेकदा खट्टू व्हायचे..कधी कधी चीडही यायची..जेव्हा बघावे तेव्हा कधी भाजीवाली, कधी मोलकरीण ऐसपैस बसून दोन घास खात आहेत.*

*तेव्हा मी तरुण विशीतील युवती होते, थोडाफार एक शिक्षणाचा आत्मविश्वास आणि अहंकारही होता. त्या अहंकारातून मुसमुसुन राग यायचा..त्या फुकटच्या पत्रावळी आणि दोन घास आदरातिथ्याचा..*

*म्हणता म्हणता दिवस सरले..सासूबाई आणि सासरे हे काळाच्या आड गेले..आणि नकळत काळाने मलाही बदलले.*

*आज लोणावळ्याच्या घरी तिकडची नोकर जयश्री आली..तिला मी नकळत बोलले, जयश्री "दोन घास" खाऊन जा गं..ताकाची कढी केली आहे"..आताशा कुणीही आला आणि आपल्याकडे दोन घास खाऊन गेला नाही हे गणित माझ्या हिशेबात जुळत नाही..परिस्थितीच्या अनेक आवर्तनात माझा तारुण्यातील सरंजामी अहंकार कधी गळला तेच कळले नाही..*
*आपण अंगमेहनत न करता खातो ही कुणकुण सतत राहते..कोळीण, भाजीवाल्या एवढ्या मोठ्या टोपल्या वाहतात, घरी येणारी मोलकरीण सर्व काम मेहनतीने करते आणि मी फक्त टेबलावर बसून कामे करते या भावनेची सतत जाणीव होते..*
*आईंना आणि माझ्या सासऱ्यांना "दोन घासात" माणसं जुळवण्याचे गणित कळले होते...*
*"दोन घास" आपण कमी खावे परंतु अन्न हे दान करण्यातच खरे सुख असते, आनंद असतो ...त्या आनंदाचे संस्कार नकळत आईंनी आणि सासरेबुवांनी माझ्यावर केले...त्यांची उतराई कशी होऊ?*

*कर्णाला तू सर्व दान केलेस पण फक्त अन्न दान केले नाहीस म्हणून पृथ्वीतलावर जा आणि अन्न दान कर अशी स्वर्गात आज्ञा होते..*

*तो पृथ्वीवर येऊन दान करतो तोच "पितृ पक्ष"..आणि मग कर्णाला मोक्ष मिळतो हे सर्वज्ञात आहे...*

*हा मोक्ष दुसरीकडे नाही, तर या जन्मी आणि याची डोळा दुसऱ्याला जेवून "दोन घास" भागीदारी करताना कृतार्थ होतांना बघण्यात आज  आणि येथेच आहे....*

*आपण एखाद्याला पैसे देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, परंतू स्वतःच्या ताटातील अन्न देणे हे वेगळे आहे..*

*अन्न हे अनेक वासनांचे बीज आहे, माणसाचे मन हे अन्नाशी निगडीत आहे. म्हणूनच अन्न आणि वृत्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा अतूट संबंध आहे..*

*जेव्हा आपण दुसऱ्याशी "दोन घासाची" भागीदारी करतो तेव्हा अहंकाराचा, वासनांचा त्याग करत असतो...*

*अश्याच एखाद्या मौळीत मी गेलेली असते..छपरातून पाणी टपटप पडत असतं.. घरात पोरं उघडी बसलेली असतात..वयात आलेली एखादी तरणी थोडीशी चिंधी गुंडाळून बसते..आणि घरची अठराविश्व दारिद्र्याची मालकीण मला म्हणते,"मॅडम दोन घास आमच्याबरोबर खा" तेंव्हा माझे डोळे पाणवतात..माझ्या कधी काळच्या सरंजामी अहंकाराची, माझीच मला घृणा येते..*

*माझ्या वृद्ध, गरीब आईंना कळलेली दोन घासाची माणुसकी मला पुन्हा पुन्हा दाद देऊन जाते..*

*आपणास देखील "दोन घास" हा मेसेज आवडला तर या पुढे आपण देखील आपल्या ताटातले दोन घास नक्की द्या धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
C&P
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

🌹🌹हा बदल नक्की केव्हा झाला ? 🌹🌹

काही काळापूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता. मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली  जायची  आणि मुलाला   येण्याजाण्याच्या तिकीटा पुरते आणि दिवसाला फारतर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. 
आणि आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात.  मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत किंवा इच्छा आई-वडिलांकडे असतेच असे नाही.
हा बदल केव्हां झाला ?

कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्ट मध्ये खुशाल फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते.  पण स्पष्टपणे मुलीला अंगभर कपडे घाल असे म्हणायची हिंमत करत नाही.  
हा बदल केव्हां झाला ?

वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर वर खाणे मागवते. 
हा बदल केव्हां झाला ?

फोटो पाहून पसंत पडल्यावर एक दोन वेळा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये लग्नाअगोदर भेटणे म्हणजेच पुढारले पण मानले जाणारे आई-वडील सहजतेने मुलांचे लिव-इन रिलेशनशिप स्वीकारतात. 
हा बदल केव्हां झाला ? 

वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसे घरातल्या तरुण मुलांपुढे सहज ग्लास भरु लागली. 
हा बदल कधी झाला ?

नातवंडांना जवळ घेणारी नातीच्या  केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी आता सकाळी योगा क्लास नाही  तर लाफ्टर् क्लासला जाते. आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोट साठी भांडते. आणि आजोबा ?  त्यांची तर वेगळीच दुनिया.  ते फेसबुक आणि व्हाट्स्अॕप् शिवाय जगू शकत नाहीत.
हा बदल केव्हां झाला ?

घरातल्या कोणाशी बोलत  नाहीत अशांना कौन्सेलर् जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात. पण स्वतःच्या जन्मदात्यां वर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल.  नवरा बायको दोघेही कमावतात. पण कुठे  खर्च झाले, किती गुंतवले गेले, कुठे गुंतवले गेले ते फक्त सीए ला माहित असते. 
मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. 
असे का होते ? 

नवऱ्याला अहो म्हणणाऱ्यांच्या मुली स्वतःच्या नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, त्याला टोमणे मारतात, सगळ्यांसमोर उणी दुणी  काढतात. अशा वेळी  मुलीचे आई-वडील कसनुसे हसतात.  आणि मुलाचे आई-वडील हतबुद्ध होतात. 
हा बदल कधी झाला ? 

मुलगा सून  वेगळे  घर घेतात पण मुलांच्या आई-वडिलांना शेवटी समजते.  लग्नात सासरकडून मिळालेले दागिने दोन-तीन वर्षात मोडून दुसरे बनवले जातात. 
असे का होते ?

तरुण मुले एक नोकरी सोडतात दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितले जाते. त्याच्या पेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रिपप् ला जाणे, ब्रेक्अप् होणे, सिनेमाला जाणे,  पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन्, कपडे वगैरे खरेदी करणे. अशा गोष्टीत आई-वडिलांनी दखल दिलेली आताच्या मुलांना आवडत नाही.
असे का होते ? 

नातेवाईकांकडे जाणे, शेजार्‍यांकडे वेळप्रसंगी जाणे लग्न समारंभात सहभागी होणे, कुळाचार पाळणे, देवळात जाणे, पूजा करणे इत्यादी गोष्टींवर आता काही  घरात नाराजी, नाही तर भांडणे होतात. 
असे का होते ?

मान्य आहे दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच, पाचवारी नेसणाऱ्या सुने बद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हा ही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही, तर दरी निर्माण झाली आहे, असेच वाटते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼💐💐💐💐💐

*कालिदासांना* ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक *वृद्ध स्त्री* विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली. 

कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे. 

वृद्ध स्त्री म्हणाली *प्रवासी तर फक्त दोनच आहेत* एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात. 

कालिदास म्हणाले मी  *अतिथी* आहे. पाणी मिळेल ? 

वृद्ध स्त्री म्हणाली अरे *अतिथी तर फक्त दोनच* आहेत एक *धन* आणि दुसर *तारुण्य* ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ? 

कालिदास म्हणाले मी *सहनशील* आहे. आता तरी पाणी मिळेल ? 

वृद्ध स्त्री म्हणाली, 'अरे सहनशील तर तर *फक्त दोनच* आहेत ! एक *धरती* 🌍आणि दुसरं *झाडं* 🌵धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील *ओझं* घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती *मधुर फळच* देतात.

*कालिदास आता हतबल झाले,*      

कालिदास म्हणाले *मी हट्टी आहे.* 

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, *हट्टी तर फक्त दोनच* आहेत *एक नख*💅🏻ं आणि *दुसरे केस*, कितीही *कापले* तरी परत वाढतातच. 

कालिदास आता कंटाळले  आणि  

*कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे*. 

वृद्ध स्त्री म्हणाली *मूर्ख तर  फक्त दोनच* आहेत एक *राजा* ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.  

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या *स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी* उभी होती, कालिदास आता *नतमस्तक*🙏👏👏 झाले. 

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, *शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.* शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 

*तात्पर्य:* विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. वाचनात आलेला हा एक सुंदर लेख !
मी लिहिलेला नाही ! लिहिणाऱ्याचे आभार.

एक सत्य*
 😊😊😊

    *८४ लाख जीवांमध्ये फक्त*  *माणूस पैसे कमावतो* *पण कुठलाच जीव उपाशी रहात* *नाही आणि माणुस पॆसे* *कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही !
🙏🙏🙏श्री गुरुदेव माऊली🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌷🌷🌷🌷🌷

*पिशवीभर आनंद!

शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका माॅलमध्ये एक प्रौढ दांपत्य खरेदीला आले होते. खरतर आता दोघेच असतात घरी, फारशा वस्तू लागत नाहीत पण थोडा वेळ जाईल, कंटाळवाण्या रूटिनमध्ये थोडा बदल होईल म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता. शनिवार रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचे.  सवयीने एक ट्राॅली घेऊन त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. त्याचवेळी,  त्यांचे लक्ष आजूबाजूच्या खरेदीकरता आलेल्या लोकांवर होते. त्यांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्यापेक्षा लहान दांपत्याने. ते दोघे खरेदीत मश्गुल झाले होते.  आवडलेली एखादी वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत, माहिती वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही हे ठरवत होते.  एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर आहे असे जाणवले की किंचीत नाराज होऊन ती वस्तू परत नीट जागेवर ठेवत होते. ज्येष्ठ दोघांनी हे सगळं टिपले आणि आपसात एकमेकाकडे बघून हसले  ज्येष्ठ दांपत्याला आपले नवशिकेपणाचे दिवस आठवले. एकेक रूपया खर्च करताना विचारपूर्वकच ठरवावे लागायचे असे ते दिवस होते.

काय वाटले कोणास ठाऊक, ते दोघे त्या वयाने लहान नवरा बायकोकडे चालत गेले. 

"नमस्कार,  आपण ओळखत नाही एकमेकांना. माझ्याकडे या माॅलचे दोन हजार रुपयांचे एक फ्री कुपन आहे. त्याची मुदत चार दिवसात संपणार आहे , आम्हाला काही खरेदी करायची नाही तर तुम्हाला ते कुपन दिले तर चालेल का?" 

समोरून सहाजिकच प्रश्न आला, "त्या बदल्यात  आम्हाला किती पैसे भरावे लागतील?" 

"दोन हजारापर्यंत काहीच नाही, त्याहून जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भरावे लागतील". ज्येष्ठ जोडप्यातल्या नव-याने  शंका समाधान केले. 

तरूण दांपत्याला आश्चर्य वाटले. त्यातली बायको म्हणाली, "आम्हालाच का देताय हे तुमचे कुपन?" 

"मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडणार.. कारण  मगासपासून आम्ही तुम्हाला बघतोय, आमचे सुरूवातीचे दिवस आठवले आम्ही पण असेच टॅग बघून खरेदी केली अनेक वर्षे! हे पहा, तुम्हाला फसवायचा, त्रास देण्याचा हेतू नाही पण वापरले नाही तर हे कुपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला. या बदल्यात  तुमची खरेदी झाली की आपण शेजारी आईसक्रीम शाॅप आहे तिथे भेटू, चालेल?" ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला. 

तरूण जोडप्याने एकमेकांकडे पाहिले आणि ते कुपन घेऊन ते खरेदीकरता वळले ज्येष्ठ जोडपे कॅश काऊंटरच्या दिशेने निघाले. 

तरूण जोडप्याची चर्चा सुरू झाली, काय घ्यावे? त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती घरची जरा बिघडलीच होती. ती दोन हजारात नसती आली, मग कपडे वाळत टाकायचा स्टँड तो ही महाग होता. बराच काथ्याकूट झाल्यावर नवरा म्हणाला, " सरळ वाण सामान घेऊन जाऊ.."

त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली, " तेवढं आपण दोघे आरामात कमावतो, आता अशा गोष्टी घेऊ ज्या सहसा आपण घेणार नाही. " नव-याला लगेच पटली ही कल्पना. दोघांनी पटपट यादी करायला सुरूवात केली. 

मुलांसाठी मोठ्या रंगपेट्या, शाळेचे लेखन साहित्य,  चाॅकलेट, सुकामेवा, मुलांच्या आवडीचा खाऊ, स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथन, डाव, मसाले असे बरेच काही घेताना ते सतत बेरजा करत होते. दोघांना मजा आली खरेदी करताना.  कॅश काऊंटरवर वस्तू मोजून घेताना त्यांच्या लक्षात आले एक मोठी पिशवी छोट्या छोट्या वस्तूनी भरून गेली होती. 

दोघं आनंदी चेह-याने बाहेर आले. समोर ते दांपत्य होतेच. 

चौघे आईसक्रीम शाॅपमध्ये बसले. ऑर्डर दिली. आईसक्रीम खाताखाता ज्येष्ठ दांपत्यातला नवरा म्हणाला, "पोरांनो,  ऐकाल माझे?" दोघे कान टवकारून ऐकू लागले. 

"आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला. जर महाग गोष्ट घेतली असती तर एकच आली असती, पण बघा आज तुमच्या पिशवीत लहानलहान गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या काळासाठी का होईना खूप आनंद देणार आहेत..आणि जन्मभराच्या आठवणीदेखील. आपले आयुष्य असंच आहे एक महागाची मोठी गोष्ट परवडत नाही म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे आनंद जगायला काय हरकत आहे? मोठी ध्येय असावीत पण त्यामागे धावताना रोजचे छोटे आनंद तेवढे निसटू देऊ नका..साॅरी बर का, एकदम प्रवचनच दिले मी तुम्हाला" असे म्हणत दोघे उठले आणि गेटकडे निघालेदेखील. तरूण जोडप्याला "धन्यवाद" म्हणायचा वेळही न देता. ते दोघे भानावर आले तेव्हा त्यांना जाणवले ," अरे ते दोघे उतरले बघ.."  बायको म्हणाली पण तोवर ते दोघे ज्येष्ठ खाली उतरले पण होते.. "उतरले ग ते ! साध थँक्यू पण म्हटले नाही आपण..."  नवरा म्हणाला. 

"आपली परिस्थिती सुधारली ना की असाच पिशवीभर आनंद देऊ कोणा अपरिचिताला..आपोआप थँक्यू पोचतील त्यांना,  काळजी नको करू". बायकोने नव-याला आश्वस्त केले. 

त्यांना जाणवले खूप मोठा धडा शिकलोय आपण. तो 'पिशवीभर आनंद'  घेऊन आपल्या घराकडे ते आनंदाने निघाले..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*अगरबत्ती* ...!!!

ती...! 

मला भेटली फुटपाथवरच... भिक मागत...! वय वर्षे 70 च्या आसपास... दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण...
तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो... 
अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी... (मळकी हा शब्द खुप थीटा आहे)

याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे... अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे कापड ती अंगावर गुंडाळते... जे झाकायला जावं तेच उघडं पडतं... आणि दुर्दैव असं की तीला ते कळत नाही... जाणवत नाही... कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तीला काही दिसतच नाही...! 

एकुण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये... तीच्याजवळ कुणी बसुच नये...! 

तरीही मी जातो, बसतो.. तीच्याजवळ .. याचं कारण तीचं लाघवी बोलणं... 
हिच्या गोब-या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो... जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर ...!
अतिशय शुद्ध आणि सात्त्विक ! 

भिक मागतांना म्हणते... बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकुन मला काही देवु नकोस... आधी तु घे, प्रसन्न हो, त्यातुन काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे... अन्यथा नको ! 

गोळ्या मागतांना म्हणते, डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या, अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खुप आहेत अजुन, त्यांना आधी द्या... मी काय करेन थोडं सहन... !

दुस-याचा विचार करण्याच्या तीच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो... 

तीच्याजवळ बसलं की, तीचं बोलणं ऐकता ऐकता... बोलण्यातुनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला... 

शेजारी बसलं की विचारते, मी एक श्लोक म्हणु... ? आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही "विश्वप्रार्थना" म्हणायला सुरुवात करते... सर्वांना चांगली बुद्धी दे... आरोग्य दे.....आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे...!

या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे...तो स्वतःला अजुन काही तरी मिळुदे म्हणुन "लाचार" होतोय... आणि सर्वस्व गमावुन बसलेली ही आज्जी दुस-याला सुखात ठेव म्हणुन "प्रार्थना" करत्येय...! 

स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी... आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना ... दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला...! 

ही आज्जी, एका मॕनेजर ची बायको... भरपुर श्रीमंती आणि खानदानी संस्कार, रास्तापेठेत यांचा जुना बंगला होता... सगळं काही होतं... पण घरात कुणी चिमुकलं नव्हतं... दोन वेळा पोटातच बाळ गेलं...मरता मरता वाचली... तिसऱ्यावेळी डाॕक्टरांनी सांगितलं... आता तुम्हाला बाळ होणे नाही... दत्तक घ्या... मधल्या काळात यजमान गेले... इतके दिवस "दुर" असलेले सगळे नातेवाईक "जवळ" आले... आठवतील ती नाती सांगुन घराची वीट न् वीट घेवुन गेले... 

सगळी "नाती" बरोबर येताना "पोती" घेवुन आली होती... 

या पोत्यांतुन सर्वस्व वाहुन नेलं हिचं...हिच्याच डोळ्यादेखत...

असलेली सगळी "नाती" हिंदकाळत "गोती" खात गेली...आणि वाड्याची ही खानदानी मालकिण आता फुटपाथची राणी म्हणुन जगत्येय... गेली 15 वर्षे...
विश्वप्रार्थना गात... सर्वांना सुखी ठेव म्हणत...! 

आपल्या अंगावरही धड कापड नसतांनाही... गात असते...सर्वांना ऐश्वर्यात ठेव...! 

सगळ्यांनी लुबाडुन घेतलं तरी आर्त प्रार्थना करते.... सर्वांचं भलं कर...कल्याण कर.... 

ऐकणारा "तो" तीचं ऐकतोय की नाही माहित नाही... तरीही गोब-या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे...!

मी एकदा चाचरत हिला म्हटलं, मावशी तु मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस ? 

ती म्हटली... अस्वच्छ ...? मी कुठंय अस्वच्छ ...??? 

अगं हा वास...? मी आवंढा गिळत...नजर चोरत बोललो....

ती म्हटली, हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ? लहान आहेस तु बाळा अजुन....  अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या रक्षण केलंय माझं... ! ती हसत बोलली...!!! 

म्हणजे...? 

कानाजवळ येवुन बोलली... 

तुला माहीत आहे ? कापुर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत...मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येवुन चावत नाहीत... 

ही घाण नाही बाळा, हे माझं कापुर आहे... माझी अगरबत्ती आहे... या कापरामुळंच आणि अगरबत्ती मुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वा-यालाही येत नाहीत...

बापरे... मी हा विचार ऐकुन हादरलो....

केवळ शील जपण्यासाठी जाणुन बुजुन ही घाणीत राहते... 

आपण कुठल्या समाजात राहतो ? स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं... दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं...
या आज्जीनं नव-यामागं स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवुन घेतली होती... मुद्दाम दुर्गंधीत झाली होती.... गंमत पहा कशी... एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं.. काटे बोचतात, पण फुलाला जपतात तसं...

मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला... आता अंगावरची तीच्या एक इंचाची घाण म्हणजे तीनं अंगावर चोपडुन घेतलेलं पवित्र लभस्म आहे असं मला वाटायला लागलं.... आणि तीच्यातुन येणारा दुर्गंध म्हणजे सुगंधी कापराचा वास...!!!

या आजीला मी डोळ्याच्या आॕपरेशन साठी घेवुन आलो 27 तारखेला... 
अंगावर तीच अर्धीमुर्धी साडी... आणि तोच वास...! 

दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच हिला पाहुन नाक मुरडलं... नाकाला पदर लावले... कुणी कुणी चक्क उठुन निघुन गेले...

बरोबरच आहे, चिखलात फुललेलं हे कमळ आहे, याची कुणालाच जाण नव्हती... इतरांसाठी हा वास होता... आणि माझ्यासाठी सुगंध...
संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना ? 

बाळाच्या शी शु चा "आईला" कधीच "वास" येत नाही... दुर्गंधीत असुनही.... 

जवळचं माणुस कुणी गेल्यावर, पार्थिवाशेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वास ही नकोसा वाटतो मग... सुगंधीत असुनही....! 

वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत...

समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची... चांगली भावना असेल तर सुगंधच सुगंध नाहीतर फक्त घाणेरडा वास...!!!

मी आज्जीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं पाहीलं ...आणि मुक नजरेनं आमच्या भुवड ताईकडं पाहिलं... 

भुवड ताईने त्याच मुक्या नजरेनं भुवड बाबांकडं पाहिलं... कुणीच कुणाशी काही बोललं नाही.... 

बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले... बरोबर 20 मिनिटांनी परत आले... हातात दोन साड्या, एक गाउन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टाॕवेल...!

मला हेच सांगायचं होतं भुवड ताईंना... न बोलताही त्यांना कळलं....मुक्या नजराही किती बोलक्या असतात ना काहीवेळा ...?

भुवड ताईंनी मग, या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरुम मध्ये नेलं... बाळाला चोळुन घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली... 

भुवड ताई या वेळी मला एका लेकराची माय वाटली... कुठल्याही वासाची लागण न झालेली...! जे आहे ते सारं सुगंधीच आहे असं समजुन तो सुगंध अनुभवणारी.... 

आणि ती आज्जी झाली होती एक छोटं निरागस बाळ... 

बाथरुम मधुन दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त सुगंध आला माझ्या भुवड ताईच्या हाताचा.... जगातले सर्वात सुंदर हात होते ते... आणि तितकेच सुगंधी ....!

शुचिर्भुत झालेल्या आजीचं नवं रुप पाहुन मी स्तिमित झालो...
आजीचं 27 तारखेलाच डोळ्याचं आॕपरेशनही करुन घेतलं.... आता तीला दिसायला लागेल ! 

आॕपरेशननंतर,मी तीचे हात हातात घेवुन म्हटलं... आज्जी... तुझ्या अंगावरचं "भस्म" आणि "कापराचा वास" आज आम्ही काढुन टाकलाय.... तुझी ही कवचकुंडलं काढुन घेतली आहेत... पण काळजी करु नकोस... तुला आजपासुन अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही.... 

म्हणजे ? आज्जी बोलली....

मी म्हटलं.... आता जीथं तुला सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे... 

इथुन पुढं तु गटारीत घाणीत फुटपाथवर राहणार नाहीस... मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी ....!

पण तु हे का करतोयस माझ्यासाठी ? तीनं निरागस पणे विचारलं.... 

मी ही तितक्याच निरागसतेनं सांगीतलं... तु मला सांगीतलं होतंस ना ? तुझं बाळ दोनवेळा पोटातच गेलं.... 

अगं ते गेलं नव्हतंच कधी.... डाॕक्टरांनी खोटंच सांगितलं होतं तुला... मी तेच बाळ आहे तुझं....!!! फिरुनी पुन्हा जन्मलो मी....!!!

तीचे डोळे डबडबले.... माझ्या गालावरुन हात फिरवत, ती प्रसन्न हसली... म्हणाली श्लोक म्हणु...?

नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता... तीनं डोळे मिटले... 

माझे हात हाती घेतले... ते हात तसेच हातात ठेवुन तीने स्वतःचेही हात जोडले...

... आणि विश्वप्रार्थना सुरु केली.... माझे हात हाती घेवुन....

सर्वांना चांगली बुद्धी दे...सर्वांचं भलं कर, सर्वांना आनंदात ऐश्वर्यात, सुखात ठेव, कल्याण कर, रक्षण कर... आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे....! 

मी तीच्याकडं एकटक पाहत होतो.... स्वतः जळत राहुन दुस-याला सुगंध देणारी ती एक सुवासिक अगरबत्ती आहे असा मला त्यावेळी भास झाला....!!!
आणि सारा आसमंत चक्कं सुगंधी झाला.....!!! 

- Dr. Abhijit Seema Sonawane
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*ओंजळ!*

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचताना आज एक ओळ फार आवडली.
'महाराज, करतल भिक्षा घेत असत'
'करतल ' म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..
मला हा शब्द खूपच आवडला..
म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे 'करतल' असावे असे मनात आले.
करतल म्हणजे ओंजळभर !
आता हेच पहा ना.. 
खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.
इतकंच काय, ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.
आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती मिळते.

खूप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेचं म्हणून समजा..

आणि कधी एखादा सुलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करतो..

बाप रे... केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे..

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले.

दुसऱ्या च्या ओंजळीने पाणी पिऊ नये वगैरे वगैरे ह्या विचाराशी विरोधाभास दाखवणारे शब्द प्रयोग आहेत म्हणा...
पण आपण नेहमी राजहंस होऊन मोत्यांचा चारा टिपावा असे वाटते. त्यामुळे त्या कडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलेले बरे!

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि 'पसायदान' मागितले...
आज लिहायला बसताना आणि माझ्या ओंजळभर शब्दांना दाद देणाऱ्या तुमच्या सगळ्यांची आठवण आली..
म्हणजे माझे ओंजळभर शब्द मी तुमच्या ओंजळीत टाकतो
आणि तुमची भरभरून दाद मिळाली की त्याचे सोने होते..

आज तुमच्या हातात ओंजळ रीती केली आणि आपसूक हात मिटले गेले..
परमेश्वरा समोर जोडतो ना तसेच!
आणि मग मन भरून आनंदाची अनुभूती झाली हे वेगळे काय सांगू?
🙏🙏
🌹🍃🌹🌾🌹🎋🌹🍂🌹
केवळ अप्रतिमातलं अप्रतिम *प्रसाद...* एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ ! माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते. गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला. देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही ! गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती. कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला ! गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला; तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घालमेलच संपते. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो. एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो! देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे... लेखक : अज्ञात

No comments:

Post a Comment