Sunday, December 19, 2021

माझ्या नोकरीचा पहिला दिवस

माझ्या नोकरीचा पहिला दिवस श्रीमती सोनाली मधुकर साळुंखे) नोकरी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असते.ते माझे ही होतेच.१९९८ला D.ed झाले आणि नोकरीसाठी वाट पाहू लागले.तब्बल ५वर्ष मला माझ्या नोकरीसाठी वाट पहावी लागली.आणि २२जानेवारी २००३रोजी माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मला नोकरीचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले.माझा आनंद गगनात मावेनासा झाला.माझ्या मिस्टरांचा हट्टच होता की नोकरी करु देईन ती जिल्हा परिषदेचीच नाही तर नाहीच. तरी मी देखील हट्ट करुन ३ खाजगी शाळांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले.लेखी पास झाले पण मुलाखतीसाठी मला मिस्टरांनी जाऊच दिले नाही.कारण त्यांना त्यावेळच्या खाजगी शाळांच्या वातावरणाची,परिस्थितीची माहिती होती.माझा देखील मग पर्याय संपलाच. ती ५वर्ष माझ्या आयुष्यात ५ तपांप्रमाणे होती.नोकरीसाठी माझा रोज देवाकडे धावा सुरु होता.आणि तो भाग्यवान दिवस माझ्या आयुष्यात २००३ साली उजाडला.माझ्या मिस्टरांचे प्रशिक्षण गावातच तालुक्याच्या ठिकाणची सुरु होते आणि आम्ही देखील तालुक्याच्या ठिकाणीच राहत होतो. मला मैत्रिणीचा फोन आला की ऑर्डर पोस्टा मार्फत येत आहेत ,माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता.तशीच धावत पळत प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोहचले मिस्टरांना सर्व हकीकत सांगितली.आमचा मोर्चा आम्ही पोस्टाकडे वळला तोपर्यंत पोस्टमन काका आपल्या कामासाठी निघून गेलेले होते.तेथेच वडीलांचा फोन आला,धापा टाकतच घर गाठले.नियुक्तीपत्र हातात आणि आनंद अश्रु माझ्या सकट सर्वांच्या डोळ्यात होते.सर्वांना खुपच आनंद झाला माझ्या मेहनतीच चिज झाल्याचे समाधान आई वडीलाना वाटत होते.माझ्या कुटुंबातील नोकरी करणारी मी पहिलीच मुलगी होते म्हणुन अभिमानाने वडीलांची छाती फुलली होती. नियुक्तीपत्रात मिळालेले गाव होते अनवर्दे खु"जे तालुक्यापासुन ३०कि.मी अंतरावर होते.मग मिस्टरांनी मोटारसायकल काढली.तोपर्यंत दुपारचे ३.४५झालेले शाळेच्या वेळेतच हजर व्हायचे म्हणुन सुसाट वेगाने आमची गाडी निघाली अनवर्दे्याच्या दिशेने,माझ्या मनाची गती ही गाडीच्याही वेगाला मागे टाकत होती.कारण आज मी प्रत्यक्ष माझ्या नोकरीवर हजर होणार होते.बाल चिमुकल्यांचे नवनवीन चेहरे मला आता रोजच पहायला मिळणार होते.त्यांना मला भरभरुन ज्ञान द्यायला मिळणार होते.मलाही नवनवीन शिकायला मिळणार होते.विचारातच मग्न असतांना केव्हा माझ्या नोकरीचे गाव आले ते मला कळले देखील नाही.शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आमची गाडी थांबली मी उतरुन आधी प्रवेशद्वाराला नमस्कार केला.कारण या पवित्र विद्या मंदिराचा एक भाग मी होणार होते.ऑफिसमध्ये आम्ही प्रवेश केला तोपर्यंत "नविन बाई" आल्या अशा चिमुकल्यांच्या आरोळ्या सर्व शाळेभर ऐकू येऊ लागल्या.मुले हळूच येऊन दारा आड डोकावून मला न्याहळत होती.मुलांच्या आरोळ्यामुळे शाळेतील इतर शिक्षकांना कुणीतरी नविन बाई शाळेत हजर व्हायला आल्यात याची कल्पना आली.सर्वजण ऑफिसमध्ये आले.सर्वांशी माझा परिचय झाला,मनातील एक अनामिक भिती,दडपण दूर झाले.मस्टरवर पहिली सही करतांना माझा ऊर भरुन आला.गावातुनच पेढे मागवून सर्वांनी माझे तोंड गोड केले.सर्व शिक्षकांमध्ये मी सर्वात लहान(वयाने) होते.तेथेच मला आई वडीलांप्रमाणे प्रेम,माया करणारे माझे सहकारी,गुरुजन लाभले.बघता बघता घड्याळाचा काटा ५वर कधी येऊन थांबला हे आम्हाला कुणालाच कळले नाही.नव्या दिवसाचे नवे स्वप्न घेऊन आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.आणि माझ्या नोकरीच्या पहिला दिवसाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. श्रीमती सोनाली मधुकर साळुंखे उपशिक्षिका,चोपडा(जळगाव)

1 comment:

  1. ख़ुप खुप अभिनंदन सोनाली तु असेच जीवनात यशस्वी हो हीच सदिछा

    ReplyDelete